आजची यशोगाथा : विकास कारंडे ( २२ एप्रिल २०२६ )
परिचय पत्र
नाव: विकास कारंडे
वय: ४० वर्षे
उंची: १६३ सेमी
वास्तव्य: नवी मुंबई
व्यवसाय: शासकीय नोकरी
मोबाईल: ९५२७२८४१४२
बदलती विलासी जीवनशैली, नोकरीच्या ठिकाणी बैठी कामकाज पद्धती तसेच व्यायामाच्या अभावामुळे माझे वजन उंचीच्या तुलनेत २० किलो वाढले होते, म्हणजे जवळपास ८३ किलो इतके प्रचंड झाले होते. त्यामुळे मला दैनंदिन शारीरिक हालचाली करताना अडचणी येत होत्या. त्यात मला वजनामुळे सतत आळस, प्रचंड घाम आणि थकवा येत असल्याने अपुऱ्या हालचालीमुळे वजन आणखी वाढू लागले होते. त्यामुळे माझ्या स्वभावात चिडचिड वाढली होती.
वजन कमी करण्यासाठी मी येणाऱ्या नवीन वर्षाची वाट बघत असे. नाहीतर वाढदिवसापासून व्यायाम सुरू करू तर कधी दसरा, दिवाळी, नवीन वर्ष असे नवनवीन मुहूर्त शोधत आज-आज उद्या-उद्या करत मी व्यायामापासून दूर पळत होतो.
जरी प्रयत्न केलाच तर कधीही ही मजल एका आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकू शकली नाही. आता अनेकदा माझ्या वजनावरून विशेषतः वाढलेल्या पोटावरून मित्र, नातेवाईक यांच्यात मी चर्चेचा विषय होऊ लागलो होतो.
स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मला धाप लागणे, कामात कसलाही उत्साह न वाटणे, दिवसा झोप येणे, सकाळी उठू न वाटणे, अंग जड होणे, पाय सुजणे यासारख्या लक्षणांना सामोरे जावे लागले. त्यामुळे मी इंस्टाग्राम/युट्यूब चॅनेलवर वजन कमी करण्यासाठी उपायांचा शोध घेणे सुरु केले.
अशातच मला ABP माझा या टिव्ही न्यूज चॅनलवर माझा कट्टा सुरू असताना आदरणीय डॉ. दीक्षित सर यांची मुलाखत बघण्याचा योग आला आणि मला माझा वजन कमी करण्याचा गुरू मंत्र सापडल्याचा साक्षात्कार झाला. मी सरांची अनेक व्याख्याने पाहिली आणि सरांनी सांगितलेल्या सहज सोप्या वैज्ञानिक जीवनशैलीचा अवलंब करण्याचा निश्चय केला.
डॉ दीक्षित सरांनी इंस्टाग्रामवर दिलेल्या माहितीवरून मला सौ. शारदा मॅडम यांचा संपर्क क्रमांक प्राप्त झाला. शारदा मॅडमनी सांगितलेल्या तपासणीच्या अहवालानुसार माझी एचबीएवनसी ची पातळी ६.५% इतकी आढळून आली. अवघ्या ४० वर्षाच्या वयात माझ्यावर मधुमेही म्हणून शिक्कामोर्तब झाला होता. तसेच, माझी उपाशीपोटी इंसुलिन २०.५३ इतकी जास्त आढळून आली होती. त्यातच माझा रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल देखील प्रचंड वाढले असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर सौ. शारदा मॅडम यांच्या सकारात्मक मार्गदर्शनाखाली माझा जीवनशैली बदलाचा प्रवास दिनांक १ नोव्हेंबर, २०२५ पासून सुरू झाला. मी पूर्वी मला अशक्यप्राय वाटणाऱ्या या जीवनशैलीचे तीन महिने कटाक्षाने पालन केले.
तीन महिन्याने मी पुनः माझ्या चाचण्यांचे अहवाल तपासले आणि आनंदाची बाब म्हणजे ते अतिशय सकारात्मक आले; त्यामुळे माझा उत्साह वाढला आणि या जीवनशैलीविषयी माझी श्रद्धा अधिक दृढ झाली. या तीन महिन्यात मी पूर्व-मधुमेही झालो आणि माझे वजन १० किलोने कमी झाले. माझे अहवाल मी सोबतच्या टेबलमध्ये दिले आहेत.
अशा नवीन बदलाने माझा आत्मविश्वास दुणावला तर आहे. आता माझे कार्यालयीन सहकारी, मित्र नातेवाईक मला या बदलाचे, उत्साहाचे रहस्य विचारतात तेव्हा मी सर्वांना ही जादू केवळ आणि केवळ आदरणीय डॉ. दीक्षित सर यांच्या जीवनशैलीमुळे झाली असे सांगतो.
मी स्वतः ही जीवनशैली कायम अंगिकारली आहेच पण मला डॉ. दीक्षित सर आणि त्यांच्या सहकारी टीमसोबत इतरांची सेवा करायची आहे.
मी आदरणीय डॉ. दीक्षित सर, सौ.शारदा मॅडम या दोघांचा सदैव ऋणी राहीन. मला प्रेरणा आणि साथ देणारी माझी पत्नी दिपाली हिचा देखील या प्रवासात महत्त्वाचा वाटा आहे.
(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)


