आजची यशोगाथा : मनोज खाडीलकर (२८सप्टेंबर २०२६)
परिचय पत्र
नाव: मनोज खाडीलकर
वय: ६० वर्षे
उंची: १६५ सेंटीमीटर
व्यवसाय: सेवानिवृत्त
वास्तव्य: सुरत, गुजरात
मोबाईल: ९३७४५३७९४९
डिसेंबर २०२५ मध्ये माझी तब्येत ठीक वाटत नव्हती. त्यामुळे मी काही महत्त्वाच्या रक्ताच्या तपासण्या करून घेतल्या. त्यामध्ये माझी एचबीएवनसी ९% असल्याचे आढळले. त्यानंतर मी तातडीने आमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी मला मधुमेहाची औषधे सुरू केली आणि तीन महिन्यांनंतर पुन्हा मधुमेहाच्या रक्ताच्या तपासण्या करण्यास सांगितले.
मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात मी डॉक्टरांनी दिलेल्या मधुमेहाच्या औषधांमधील घटक वाचले. त्यावरून मला औषधांचा डोस जास्त असल्याचे जाणवले. ही औषधे दीर्घकाळ घेत राहिलो तर त्यांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते, असे माझ्या लक्षात आले.
म्हणून मी डॉ. दीक्षित जीवनशैलीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. या आहारपद्धतीबद्दल मला आधीपासून माहिती होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये मला डॉ. दीक्षित सरांना भेटण्याची संधीही मिळाली होती. मी व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन श्री. भास्कर भट्टाचार्य यांच्या संपर्कात होतो आणि मार्च २०२६ पासून ही जीवनशैली पाळण्यास सुरुवात केली.
मला गोड पदार्थांची विशेष आवड नाही; मात्र मला चहा खूप आवडतो. चहा सोडणे माझ्यासाठी कठीण असेल, हे मला माहीत होते. त्यामुळे जेव्हा चहा पिण्याची इच्छा होत असे, तेव्हा मी स्वतःला कामात व्यस्त ठेवत असे. अनेक प्रयत्नांनंतर मला चहा पिण्याची सवय पूर्णपणे सोडण्यात यश आले.
जीवनशैलीतील इतर नियम पाळताना मला फारशी अडचण आली नाही. मला चालायला आवडते. तसेच मला सॅलड आणि मोड आलेली कडधान्ये आवडतात, त्यामुळे हे माझ्यासाठी तुलनेने सोपे होते. मी पोळी/भाकरीचे प्रमाण कमी करून त्याऐवजी सॅलड, टोफू, मोड आलेली कडधान्ये इत्यादींचा समावेश केला.
ही जीवनशैली पाळण्यासाठी आपला निर्धार हा सर्वांत महत्त्वाचा आहे.
पहिले तीन महिने मी कोणतीही तडजोड न करता ही जीवनशैली अतिशय काटेकोरपणे पाळली. त्यानंतर महिन्यातून एक-दोन वेळा थोडा अपवाद झाला; मात्र एकूणात मी जीवनशैली चांगल्या प्रकारे पाळली.
आता मी मधुमेहातून प्री-डायबेटिक अवस्थेत आलो आहे आणि लवकरच पूर्णपणे नॉन-डायबेटिक होईन, अशी मला आशा आहे. सध्या मी मधुमेहाची एकही गोळी घेत नाही. त्यासोबत वजन कमी होणे हा अतिरिक्त फायदा झाला आहे. आता मी ही जीवनशैली आयुष्यभर पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
मधुमेहावर नियंत्रण मिळवून तो पूर्ववत करण्यास मदत करणारी आणि मोफत उपलब्ध असलेली अशी उत्कृष्ट आहारपद्धती दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सरांचा मनापासून आभारी आहे. समाजासाठी डॉ. दीक्षित सरांचे योगदान अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे.
श्री. भास्कर भट्टाचार्य यांनी मला ही जीवनशैली पाळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन आणि सहकार्य मला खूप उपयोगी ठरले. माझ्या पत्नीनेही मला ही आहारशैली पाळण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिच्या सहकार्याशिवाय हे यश शक्य झाले नसते.
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


