आजची यशोगाथा : सुखदा कान्हेरे

0

आजची यशोगाथा : सुखदा कान्हेरे

परिचय पत्र

नाव: सुखदा कान्हेरे
वय: ५५ वर्ष
उंची: १५२ सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: गृहिणी
समूह: वॉरियर्स
मोबाईल: ९९२१६१०५०२

माहेरची हिस्टरी असल्यामुळे मला आज ना उद्या मधुमेह होणारच अशी मी मनाशी खुणगाठंच बांधली होती. साधारण तीन वर्षांपूर्वी माझे एचबीएवनसी ८.६% आले. डॉक्टरांनी ताबडतोब औषधे सुरू करायचं सल्ला दिला. माझे पती सुनील कान्हेरे यांनी दहा वर्षांपूर्वी वजन कमी करण्यासाठी डॉ दीक्षित जीवनशैली सुरू केली होती आणि होणाऱ्या फायद्यांमुळे त्यांनी तिचे पालन चालू ठेवले आहे. त्यांनी मला औषध सुरू न करता डॉ दीक्षित जीवनशैली पाळण्यासाठी प्रोत्साहित केले. मी थोड्या साशंक मनाने सुरुवात केली आणि काय आश्चर्य? तीन महिन्यातच एचबीएवनसी नॉर्मल वर आले.
त्यानंतर साधारणपणे अडीच वर्ष नियम अगदी कडकपणे न पाळल्यामुळे माझे एचबीएवनसी थोडे कमी-जास्त असायचे. परंतु, मध्यंतरी विविध कारणांनी थोडे दुर्लक्ष झाले आणि सप्टेंबर २०२५ मध्ये माझे एचबीएवनसी ८.८% आणि जानेवारीमध्ये तर चक्क १०.८% वर पोहोचले. मी फार हादरून गेले. कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी परत ‘औषध सुरू कर’ चे टुमणे लावले. कर्मधर्मसंयोगाने माझ्या मिस्टरांनी त्या सुमारालाच 90 डेज चॅलेंज बद्दल वाचले आणि मला त्यामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त केले. इतर कुटुंबीय आणि मित्र परिवाराला खात्री नव्हती पण पूर्वानुभवामुळे मी पूर्ण निर्धाराने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.

आत्तापर्यंत मी सकाळचा दुधाचा चहा सोडला नव्हता तो सोडला आणि ब्लॅक टी विदाऊट शुगर सुरू केला. चहा सोडणे पहिल्यांदा फार कठीण गेले. पण हळूहळू अंगवळणी पडले. मला गोड फार आवडते, पण ते ही मी ठाम निश्चयाने सोडले. नेमून दिलेल्या क्रमाप्रमाणे दोन वेळचे जेवण घेतले. रोजचे किमान चार-साडेचार किलोमीटर चालणे चुकवले नाही. आधीपासून चालू असलेला योगाभ्यास पण सुरूच ठेवला. रोज गुगल फॉर्म भरायचे सर्वात कंटाळवाणे काम सुद्धा केले.

नव्वद दिवसानंतरचे अंतिम निकाल:-

(क) एचबीएवनसी – १०.८% वरुन ६.८% (४% ची घट)
(ख) वजन – ६० kg वरून ५७.६ kg (२.४ किलो ची घट)
(ग) कंबरेचा घेर – ९० सेंमी वरून ८९.५ सेंमी (0.५ सेंमी ची घट)

माझी सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे खाण्यावर नियंत्रण आणि शिस्तपालनाची सवय. मला खूप उत्साही पण वाटू लागले आहे. पूर्वी माझे पाय दुखायचे, ते कमी झाले आहे. सगळेजण म्हणायला लागले आहेत की ’तू आता बारीक झाली आहेस, पण तुझ्या चेहऱ्यावरची चमक वाढली आहे’.

ह्या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ दीक्षित आणि अॅडमिन कविता मेहेंदळे तसेच मीनल डोणगावकर यांची खूप आभारी आहे. त्याबरोबरच माझे पती सुनील यांना पण धन्यवाद देते. त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले. आता डॉ दीक्षित जीवनशैली ही माझी कायमची जीवनशैली बनली आहे.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts