आजची यशोगाथा : मेधा देशमुख
परिचय पत्र
नाव: मेधा देशमुख
वय: ४४ वर्षे
उंची: १५६ सेमी
व्यवसाय: चार्टर्ड अकाउंटंट
वास्तव्य: पुणे
समूह: अचीवर्स – ८ वे वजन कमी करण्याचे आव्हान
मोबाईल: ९८१९९४६९५६
गेल्या काही वर्षांपासून मी वाढते वजन आणि सततचा थकवा या समस्यांशी झुंजत होते, जी माझ्यासाठी चिंतेची बाब होती. वजन कमी करण्यासाठी मी विविध उपाय करून पाहिले, पण दुर्दैवाने त्यातील कोणताही उपाय माझ्यासाठी प्रभावी ठरला नाही. माझ्या वडिलांनी मला डॉ. दीक्षित लाइफस्टाइलच्या एका यशस्वी अनुयायाची गोष्ट सांगितली. त्यानंतर मी डॉ. दीक्षित यांच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले आणि तिथून मला १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या ‘९०-दिवसीय वजन कमी करण्याच्या आव्हाना’बद्दल माहिती मिळाली.
मी यात सहभागी होण्याचा पक्का निर्णय घेतला. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांत सण-उत्सव कमी असले, तरी मला आंब्याच्या हंगामात आहारावर नियंत्रण ठेवण्याची काळजी वाटत होती.
हे आव्हान १ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झाले. मी माझ्या जेवणाच्या ताटांचे (थाळीचे) फोटो आणि व्यायामाचे स्क्रीनशॉट्स शेअर करत असे. सर्व ॲडमिन्सनी माझ्या जेवणाच्या ताटांचे निरीक्षण करून आणि आवश्यक तिथे अगदी बारीक-सारीक गोष्टींकडेही लक्ष वेधून मला सातत्याने मदत केली. आमचे रोजचे व्यायामाचे स्क्रीनशॉट्सही त्यांच्या नजरेखालून जात असत. आम्ही ठरवलेल्या अंतरापेक्षा जास्त चाललो, तर त्याचे नेहमीच कौतुक केले जाई. या आव्हानामुळे माझ्या आरोग्याबाबत माझ्यामध्ये स्वयंशिस्त निर्माण झाली.
पहिल्या आठवड्यापासूनच मला गोड खाण्याची इच्छा कमी होणे, ऊर्जा वाढणे असे बदल जाणवू लागले. आव्हानाचा शेवटचा महिना सुरू होईपर्यंत, मी न थकता चालण्याचे अंतर ४.५ किमीवरून ८ किमीपर्यंत सहज वाढवू शकले. इतकी वर्षे जे वजन अजिबात कमी होत नव्हते, ते आता कमी होऊ लागले. यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले आणि यावेळी मी माझ्या आवडत्या आंब्यांपासूनही सहज दूर राहू शकले.
९० दिवसांचे आव्हान पूर्ण झाल्यानंतर झालेले बदल तक्त्यात दिले आहेत.
मी मनापासून डॉ. दीक्षित आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे, विशेषतः आमच्या गटाचे ॲडमिन्स – श्रीकांत डंके सर, अंजली पाठक मॅडम आणि चिंतामणी बोडस सर – यांचे आभार मानते.
आता दिवसातून दोनदा जेवण आणि किमान ४.५ किमी चालणे ही माझी जीवनशैली बनली आहे. मला जाणवणाऱ्या या सकारात्मक बदलांमुळे मी खूप आनंदी आहे आणि ही जीवनशैली मी अशीच पुढे चालू ठेवणार आहे.
(मराठी अनुवाद: अनिरुद्ध दिवेकर)


