यशोगाथा 19: तारीख: 3 मार्च 2022

0

यशोगाथा 19: तारीख: 3 मार्च 2022

परिचय पत्र

नाव: मारुती चौगुले*
वय: ५० वर्षे*
उंची: १७० सेंमी*
नोकरी: JSW मध्ये कार्यरत*
वास्तव्य: बेळगाव (कर्नाटक)*
मोबाईल: ७६६५३३०७००*
समूह : डॉ दीक्षित डाएट-वेटलॉस टेलिग्राम.

माझी परिवर्तन कथा

मला लहानपणापासून व्यायामाची आवड होती. मला कधीच मधुमेह नव्हता पण वजन जास्त होते. नोव्हेंबर २०१८ मध्ये माझे वजन ९० ते ८६ किलो दरम्यान होते.
मी एचबीएवनसी आणि उपाशीपोटी इन्सुलिन च्या चाचण्या करून अहवाल श्री. भालचंद्र बैलूर सरांकडे पाठवले. समुपदेशन करून त्यांनी मला वेटलॉस टेलिग्राम समूहात सामील करून घेतले. १ डिसेंबर २०१८ पासून मी डॉ. दीक्षित जीवनशैली प्रामाणिकपणे सुरू केली. सुरुवातीला सुमारे दोन आठवडे मला या पद्धतीशी जुळवून घेणे आणि भुकेवर मात करणे कठीण वाटले. त्यानंतर मात्र दिवसातून फक्त दोन वेळा ५५ मिनिटात जेवायची सवय झाली. दोन जेवणाच्या मध्ये फक्त पाणी व कोरा चहा घेत असे. जानेवारी-मार्च, २०१९ दरम्यान व्यायामाच्या बाबतीत मी ६० मिनिटांत ८ किमी धावत होतो आणि आठवड्यातून सरासरी ६ दिवस दररोज ३० मिनिटे वजन उचलण्याचा व्यायाम करत होतो.

सुमारे दोन महिन्यांनंतर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मला लवचिक, उत्साही व हलके वाटू लागले आणि मला दररोज गाढ झोप येऊ लागली. मी सडपातळ दिसू लागलो.

म्हणून मी श्री. भालचंद्र बैलूर व डॉ. वेदा नलावडे यांचा सल्ला घेतला आणि स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवून, लोक काय बोलतात याकडे दुर्लक्ष करून, मार्गक्रमण करत राहिलो.
प्रवासात/व्यवसाय दौऱ्यात वेळेवर जेवण मिळत नसे म्हणून मी जिथे जात असे तिथे जेवणाचा डबा घेऊन जायला सुरुवात केली.
कोविड-१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटे मध्ये मी कोविड वॉरियर म्हणून काम करत होतो तरीही सुदैवाने मला संसर्ग झाला नाही. या जीवनशैलीमुळेच माझी प्रतिकारशक्ती वाढली होती असा माझा विश्वास आहे.

ही जीवनशैली मी प्रामाणिकपणे चालू ठेवल्यामुळे काही कालावधीत माझी ताकद आणि क्षमता या मध्ये वाढ झाली आहे. मी *डॉ दीक्षित* यांच्या सल्ल्यानुसार आहार घेतो आणि दिवंगत डॉ श्रीकांत जिचकार यांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करतो.
दोन जेवणांच्या मध्ये पाणी सोडून इतर काहीही सेवन नसल्याने चहा/चाट/नाश्त्याचे व्यसन नाही. त्यामुळे वेळ आणि पैसाही वाचतो.
व्यायामाची आणि खेळाची गोडी आणखीन वाढली.
कडकडून भूक लागली असताना जेवण केल्यामुळे अन्नाचा प्रत्येक घास अधिक रुचकर लागतो. “अन्न हे पूर्णब्रह्म” का म्हणतात याचा प्रत्यय येतो.
सध्या मी आठवड्यातून सहा दिवस रोज ३० मिनिटात ५ किमी धावणे , ३० मिनिटे वजन उचलणे आणि त्या व्यतिरिक्त व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर १५ मिनिटे स्ट्रेचिंग करतो.
या जीवनशैली मधील कोणतीही गोष्ट चुकू नये वा सुटू नये म्हणून करायच्या, तसेच न करायच्या गोष्टी आणि नवीन बाबी मी लिहून काढतो. त्याचप्रमाणे दिवंगत डॉ. जिचकार व *डॉ दीक्षित* ह्यांची प्रेरणादायी व्याख्याने वारंवार ऐकतो. त्यामुळे ह्या गोष्टी मनात खोलवर ठसण्यासाठी मदत होते.
तीन वर्षात माझे वजन ९० वरून ६८ किलो इतके कमी झाले आणि कमरेचा घेरही १० सेंमी ने कमी झाला.
चहा व जेवणासाठी ब्रेक घेत नसल्यामुळे मी पूर्वीपेक्षा जास्त वेळ काम करतो.त्याची मला वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यात मदत होते.
श्री. बैलूर सरांनी डॉ संदीप काटे सरांच्या व्हिडिओ आणि मॅरेथॉन च्या आवडी बद्दल सांगितल्याने मलाही प्रेरणा मिळाली. आता मी दोन अर्ध मॅरेथॉन पूर्ण केल्या असून भविष्यातही मॅरेथॉन मध्ये सहभागी होत राहणार आहे.
माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना *डॉ दीक्षित* जीवनशैलीचे अनुसरण करण्यासाठी मी प्रोत्साहन देतो. माझी पत्नी आणि बहीण या जीवनशैलीचे पालन करत आहेत.
आपल्याला अवगत असलेले ज्ञान सर्व समाज व देशाला देण्याचा तळमळीने आणि निस्वार्थीपणे ज्यांनी प्रयत्न केला अशा पूज्यनीय कै. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानाचा साष्टांग दंडवत . आपल्या देशाचा “भारतरत्न” चमकण्या आधीच देवाने हिरावून घेतला.

या जगात अशा चांगल्या व्यक्तीही आहेत ज्या निस्वार्थीपणे समाजकार्य करत असतात. *डॉ जगन्नाथ दीक्षित* हे असे एक परोपकारी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना मनःपूर्वक वंदन .
श्री. भालचंद्र बैलूर सरांना त्यांनी केलेल्या मार्गदर्शनासाठी आणि माझ्या कुटुंबाला धन्यवाद.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts