यशोगाथा : शंकर बिरादार (तारीख 30 July 2025)
परिचय पत्र
नाव: शंकर बिरादार
वय: ६२ वर्षे
उंची: १६५ सेंमी
वास्तव्य: बिदर
व्यवसाय: निवृत्त
समूह: DRC Pune
माझी परिवर्तन कथा
जानेवारी २०२४ मध्ये मला दातांचा त्रास होत होता. तो कमी होत नसल्यामुळे माझ्या डॉक्टरांनी मला शुगर टेस्ट करायला सांगितली. तेव्हा माझी फास्टिंग शुगर १८३ व P.P. २७३ आली. तेव्हाच मला आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या डॉक्टरांनी औषधे सुरु करण्याचा सल्ला दिला. माझी मुलगी M. D. Anasthesia आहे. तिने सुद्धा लवकरच औषधे सुरु करण्याचा आग्रह केला.
मी यूट्यूबवर डॉ. दीक्षितांचे व्हिडिओ पाहिले व ती जीवनपद्धती करुन पहावी असा विचार करुन मुलीला सांगितले, “मला ३ महिने दे. मी जीवनपद्धती अनुसरुन पाहतो व त्यानंतर औषधाचा निर्णय घेऊ.”
मी सौ. अश्विनी अटकेकर यांना फोन करुन माझे रिपोर्ट पाठवले. मला मॅडमने डॉ. दीक्षित जीवनशैली बद्दल सविस्तर माहिती दिली व व्हॉट्सअपगृपमध्ये जॉइन करुन घेतले. गृपमध्ये येणाऱ्या यशोगाथा वाचून खूप आनंद होत होता व आपणही औषधे न घेता मधुमेहमुक्त्त होऊ याबद्दल विश्वास वाटू लागला. मी वारंवार मॅडमना शंका विचारत असे व त्याचे निरसन करुन घेत असे.


माझे सुरुवातीचे एचबीएवनसी ७.३% होते ते एक महिन्याने ७.१ झाले व पुढील दोन महिन्यात ६.५% झाले. हे पाहून मला फार आनंद झाला व उत्साह वाढला. माझे वजनही १० कि. ने कमी झाले. औषधे न घेता फक्त दोन वेळा जेवून व रोज ६ कि. मी. चालून हा रिझल्ट मिळाला. माझी मुलगी सुद्धा खूप खूश झाली.
माझी प्रगती पाहून डॉ. दीक्षित सरांनी मला टी शर्ट व पुस्तक देवून सेंटरमध्ये माझा सत्कार केला. त्या क्षणी माझा आनंद गगनात मावेनासा झाला. डॉ. दीक्षित सरांशी बोलल्यावर मला जाणीव झाली की सर खरच ‘देवमाणूस’ आहेत.
आता मे महिन्यात माझे एचबीएवनसी ५.९% झाले व मी मधुमेही मधून पूर्व मधुमेही झालो. मी अश्विनी मॅडम व आदरणीय डॉ दीक्षित सरांचा अत्यंत आभारी व ऋणीही आहे. त्यांच्या पूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो व सर्वांना Health, Wealth and Happiness मिळो अशी देवाला प्रार्थना करतो. मी ही जीवनपद्धती आयुष्यभर करुन मधुमेह मुक्त्त होणार आहे.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)