आजची यशोगाथा : अतुल वाड ( २२ फेब्रुवारी २०२६ )

0

आजची यशोगाथा : अतुल वाड ( २२ फेब्रुवारी २०२६ )

परिचय पत्र

नाव: अतुल वाड
वय: ६३ वर्षे
उंची: १८३ सेमी
वास्तव्य: मुंबई
व्यवसाय: आयटी व्यावसायिक, सध्या निवृत्त
समूह: EWL DM-061
मोबाईल: ९८२१७१५१२६

डिसेंबर २०१८ मध्ये मी मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान ऐकले.
त्या व्याख्यानाला उपस्थित राहण्यापूर्वी मला सुमारे ८ वर्षे मधुमेह होता. सुरुवातीला निदान झाले तेव्हा माझे एचबीएवनसी १०.५% होते आणि वजन ९६ किलो होते. कालांतराने माझ्या डायबेटोलॉजिस्ट डॉक्टरांनी मेटफॉर्मिनची मात्रा हळूहळू वाढवली. डिसेंबर २०१८ मध्ये जेव्हा मी आहार पद्धती सुरू केली, तेव्हा एचबीएवनसी ६% च्या थोडे वर होते, वजन ८४ किलो होते आणि कंबरेचा घेर ९९ सेंमी होता. हा आहार सुरू करण्यापूर्वी मी माझ्या डायबेटोलॉजिस्टचा सल्ला घेतला होता आणि त्यांनी मला या प्रवासात पूर्ण पाठिंबा दिला.

सुरुवातीचे दोन आठवडे आव्हानात्मक होते, कारण दर दोन तासांनी काहीतरी खाण्याची सवय लागली होती. त्यानंतर मी दिवसातून दोन वेळचे जेवण आणि ४५ मिनिटे जलद चालण्याचा व्यायाम नियमितपणे सुरू केला. मी योगासने ही करायला सुरुवात केली (विशेष करून अर्ध मत्स्येन्द्रासन). मला अधिक सोयीस्कर वाटावे आणि दिनचर्या पाळता यावी म्हणून माझी पत्नीही माझ्यासोबत या आहार पद्धतीत सहभागी झाली. त्यामुळे तिलाही फायदा झाला, कारण ती त्या वेळी बॉर्डरलाईन डायबेटिक होती आणि तिचाही मधुमेह टळला.

सुमारे एका महिन्यात माझे वजन हळूहळू कमी होऊ लागले. एका टप्प्यावर वजन खूप कमी होत असल्याची मला चिंता वाटली, पण ते ७७ किलोवर स्थिर झाले, जे माझ्या BMI प्रमाणे योग्य होते (माझी उंची १८३ सेमी आहे). तसेच कंबरेचा घेर ९१.४ सेंमीवर स्थिर झाला. सुमारे एका महिन्याच्या निरीक्षणानंतर मी मेटफॉर्मिनची मात्रा कमी करण्यास सुरुवात केली आणि ६ महिन्यांत (या कालावधीत इन्सुलिन रेसिस्टन्स आणि एचबीएवनसी दोनदा तपासले) मधुमेहाची सर्व औषधे पूर्णपणे बंद केली.

आता मागील ६ वर्षांपासून मी कोणतीही औषधे घेत नाही आणि माझे एचबीएवनसी ५.५ ते ५.७% या दरम्यान कायम आहे. मी दर ३-४ महिन्यांनी नियमित तपासणी करतो. जेव्हा आहारात काही वेगळे खातो, तेव्हा घरी ग्लुकोमीटरने रक्तातील साखर तपासतो. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळतो आणि काय व किती प्रमाणात मला योग्य आहे हे समजते. सणासुदीला किंवा खास दिवशी मी अधूनमधून अतिशय मर्यादित प्रमाणात गोड पदार्थ खातो, ज्याचा माझ्या एचबीएवनसी वर परिणाम होत नाही. मात्र आयुष्यभर हीच जीवनशैली कायम ठेवणे आवश्यक आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.

मधुमेहातून मुक्त होण्याच्या या प्रवासात मार्गदर्शन केल्याबद्दल डॉ. वेदा नलावडे आणि निलेश पवार यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो.

आज मी ज्या स्थितीत आहे, त्यासाठी प्रभावी मार्गदर्शन व सल्ला दिल्याबद्दल डॉ. दीक्षित यांचे मनःपूर्वक आभार मानतो. माझ्या यशाचे मोठे श्रेय माझ्या पत्नीला आहे म्हणून मी तिलाही धन्यवाद देतो.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts